2024 च्या विधानसभेच्या निवडणुका जास्त चुरशीच्या होणार. तशा त्या नेहमीच होतात. पण भाजपने लाडकी बहीण योजना आणून 1500 रुपये खात्यात वाटप सुरू केले. त्यानंतर लाडकी लेक योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींना त्यांच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळतील असे जाहीर केले.हे पाहून काँग्रेसने असे जाहीर केले की ते सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 3000 रुपये मिळणार. त्यानंतर परत भाजपने जाहीर केले की लाडक्या बहिणीला दरमहा 2100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळणार.वृद्धांना पेन्शन रुपये पंधराशे रुपये वरून वाढवून 2100 रुपये मिळणार आणि अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन मिळणार तसेच 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार.हे सांगण्याचा उद्देश हाच की, ज्या घरात पूर्वी मुलगी नको म्हणणारे लोक, मुलीची गर्भातच हत्या करणारे लोक निदान मुलगी नको असे तरी म्हणणार नाहीत. ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जात नव्हता त्या घरात स्त्रियांचा मान नक्कीच राखला जाईल. सत्तेच्या हव्यासापोटी तरी मुलगी म्हणजे धनाची पेटी हे या राजकारणी लोकांनी खरे ठरवले. बाकी महागाई कितीही वाढली, रस्ते किती खराब झाले तरी एकमेकांच्या चुरशीवर पैसे वाटप करून कोणीही निवडून येऊन लाडक्या बहिणींना लेकींना आर्थिक आधार तरी मिळेलच. एक प्रामाणिक मत असे आहे की पैसे वाटप करण्यापेक्षा रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून दिल्या असत्या तरी चालले असते.